मंडळी, आज आपण बघणार आहोत एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा? म्हणजे बँकेत, पोस्टात किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये मुदत ठेव किंवा एफडी वर मिळणाऱ्या व्याजावर जी टीडीएस कपात होते ती कशी टाळता येईल म्हणजे टीडीएस कपात होऊच द्यायची नाही. पण हे शक्य आहे का?
आज आपण बघणार आहोत असे काही पर्याय ज्यांचा उपयोग करून आपण बँक किंवा पोस्टात मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजवरील टीडीएस कपात टाळू शकतो.
मंडळी एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा? याचे हे पर्याय बघण्याआधी आपण बघूया टीडीएस म्हणजे काय? आणि टीडीएस कपात का केली जाते? म्हणजे मग या टीडीएस वाचवण्याच्या ट्रिकस कशा वापरायच्या ते आपल्याला नीट कळेल.
टीडीएस म्हणजे काय असतं?
टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (Tax Deducted at Source).
इथं सोर्स म्हणजे उत्पन्नाचा स्रोत किंवा पर्याय. म्हणजे, तुम्ही ज्या मार्गाने उत्पन्न मिळवलं असेल तो मार्ग उत्पन्नाचा स्रोत असतो. टीडीएस च्या बाबतीत या उत्पन्नावर आधी कर कपात केली जाते म्हणजे टॅक्स डिडक्शन (Tax Deduction) केलं जातं आणि मग उरलेलं उत्पन्न तुम्हाला दिलं जातं. यालाच टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (Tax Deducted at Source) असं म्हणतात.
म्हणजे आधी टॅक्स कापून घ्यायचा आणि मग उत्पन्न संबंधित व्यक्तीला द्यायचं. थोडक्यात, टीडीएस हा एक प्रकारचा आगाऊ कर असतो जो उत्पन्न मिळायच्या आधीच कापून घेतला जातो.
टीडीएस कधी लागू केला जातो?
आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं ते एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या उत्पन्नावर टीडीएस लागू केला जातो.
उदा. पगार, बँकेतील ठेवींवर मिळणारं व्याज, एखादं व्यावसायिक पेमेंट असेल किंवा घरभाडं असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर एक ठराविक रकम कापून घेतली जाते त्याला टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स असं म्हणतात.
या टीडीएस कपातीची टक्केवारी उत्पन्नाच्या स्रोतांनुसार बदलते. बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर व्याजाच्या रकमेवर १०% रक्कम टीडीएस कपात केली जाते.
टीडीएस कपात का टाळावी?
मंडळी, टीडीएस द्वारे जे पैसे बँक कापून घेते ते पैसे थेट प्राप्तिकर विभागाकडे भरले जातात आणि हि टीडीएस ची रक्कम आपण आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरेपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे पडून राहते. त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. म्हणून शक्यतो टीडीएस कपात होणारच नाही किंवा टाळली जाईल याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. म्हणजे ठेवींवरील संपूर्ण व्याज आपल्याला मिळेल आणि ते आपल्याला वापरता येईल.
बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजासाठी टीडीएस ची मर्यादा किती आहे?
मंडळी, बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजासाठी टीडीएस कपातीची एक मर्यादा दिलेली आहे.
हि मर्यादा ३१ मार्च २०२५ पर्यंत
| करदाते | टीडीएस कपातीची मर्यादा |
|---|---|
| सामान्य नागरिक | जेष्ठ नागरिक |
| ४० हजार | ५० हजार |
म्हणजे एकाच बँकेत असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल ते पुढील वर्षातल्या ३१ मार्च पर्यंत
- सामान्य करदात्यांसाठी म्हणजे ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी ४० हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर १०% टीडीएस कपात केली जाते.
- आणि जेष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी ही व्याजाची रक्कम ५० हजार पेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर १०% टीडीएस कपात केली जाते.
पण या मर्यादेमध्ये १ एप्रिल २०२५ पासून वाढ करण्यात आली आहे. आज आपण तीच वाढलेली टीडीएसची मर्यादा गृहीत धरणार आहोत आणि त्यानुसार टीडीएस कपात कशी टाळायची हे बघणार आहोत.
टीडीएस कपातीचे नवीन नियम
टीडीएस च्या नवीन नियमानुसार १ एप्रिल २०२५ पासून जर,
एकाच बँकेत असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात
| करदाते | टीडीएस कपातीची मर्यादा |
|---|---|
| सामान्य नागरिक | ५० हजार |
| जेष्ठ नागरिक | १ लाख |
- सामान्य करदात्यांसाठी म्हणजे ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर १०% टीडीएस कपात केली जाणार आहे.
- जेष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी ही व्याजाची रक्कम १ लाख रु पेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर १०% टीडीएस कपात केली जाणार आहे.
उदा.
जर सामान्य ठेवीदाराला एका बँकेत असलेल्या ठेवींवर ७० हजार रुपये व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं तर ते ५० हजार रु पेक्षा जास्त होतं. म्हणून या व्याजाच्या रकमेवर म्हणजे ७० हजार रुपयांवर बँक १०% म्हणजे ७००० रुपये एवढा टीडीएस कापून घेईल आणि ६३ हजार रुपये व्याज म्हणून ठेवीदाराला परत देईल.
पण ठेवीदार जेष्ठ नागरिक असेल तर त्याच व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात केली जाणार नाही कारण जेष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा एका आर्थिक वर्षात १ लाख रुपये करण्यात आली आहे.
मात्र जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर टीडीएस २०% एवढा कापून घेतला जातो.
उदा.
जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर ही टीडीएस ची रक्कम ७० हजार रुपये एवढ्या व्याजाच्या रकमेवर २०% म्हणजे सामान्य ठेवीदारांसाठी १४ हजार रु एवढी कापून घेतली जाईल आणि ५६ हजार रुपये व्याज म्हणून परत दिले जातील.
मात्र जेष्ठ नागरिकांना टीडीएस कपात लागू होणार नाही कारण व्याजाची रक्कम ७० हजार आहे जी रिझर्व बँकेने दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे १ लाखांपेक्षा कमी आहे.
आता हाच नियम वापरून आपल्याला आपल्या ठेवीवरील व्याजावर होणारी टीडीएस कपात कशी टाळायची हे बघणार आहोत.
एफडीवर टीडीएस कसा वाचवायचा? (FD var TDS kasa wachawaycha)
फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच भरणे
पहिला आणि बहुतेकांना माहिती असलेला पर्याय म्हणजे फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५एच भरणे.
- फॉर्म १५जी सामान्य करदात्यांना म्हणजे ज्यांचं वय ६० पेक्षा कमी असेल त्यांना भरावा लागतो आणि
- फॉर्म १५एच जेष्ठ नागरिक असलेल्या करदात्यांना म्हणजे ज्यांचं वय ६० पेक्षा जास्त असेल त्यांना भरावा लागतो.
फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५एच का भरावा?
मंडळी, फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५एच हे दोन्ही फॉर्म भरून संबंधित ठेवीदार बँकेला असं लेखी स्वरूपात सांगतात कि आमचं व्याजाचं उत्पन्न किंवा आमचं एकूण उत्पन्न करपात्र नाही, त्यामुळे आमच्या वार्षिक व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात करू नये.
फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५एच भरण्यासाठी महत्वाचे नियम
- एका आर्थिक वर्षात मिळणारं व्याज
- सामान्य नागरिकांसाठी ५० हजारांपेक्षा जास्त असेल तर फॉर्म १५जी आणि
- जेष्ठ नागरिकांसाठी हेच व्याज १ लाखा रु पेक्षा जास्त असेल तरच फॉर्म १५एच भरणं आवश्यक असेल.
- ठेवीदाराला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा ठेवीदाराचं एकूण उत्पन्न प्राप्तिकर खात्याने दिलेल्या टॅक्स स्लॅबनुसार पहिल्या टॅक्स स्लॅबच्या मर्यादेपेक्षा ज्याला बेसिक एक्सम्पशन लिमिट असं म्हणतात त्यापेक्षा कमी असावं.
आता तुम्हाला स्क्रीनवर जे टेबल दिसत आहे त्यातील या पाहिल्या टॅक्स स्लॅबच्या मर्यादेपेक्षा तुम्हाला ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न कमी असावं.
| जुनी करप्रणाली | नवीन करप्रणाली | ||
| वार्षिक उत्पन्न | टक्केवारी | वार्षिक उत्पन्न | टक्केवारी |
| ० ते २,५०,००० | ०% | ० ते ४,००,००० | ०% |
| २,५०,००० ते ५,००,००० | ५% | ४,००,००१ ते ८,००,००० | ५% |
| ५,००,००० ते १०,००,००० | २०% | ८,००,००१ ते १२,००,००० | १०% |
| १०,००,००० पेक्षा जास्त | ३०% | १२,००,००१ ते १६,००,००० | १५% |
| १६,००,००१ ते २०,००,००० | २०% | ||
| २०,००,००१ ते २४,००,००० | २५% | ||
| २४ लाखांपेक्षा जास्त | ३०% | ||
फॉर्म १५जी कोण भरू शकतो
सामान्य करदाते
- तुम्ही सामान्य करदाते असाल म्हणजे तुमचं वय ६० पेक्षा कमी असेल,
- तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिम नुसार ५० हजार पेक्षा जास्त पण अडीच लाखांपेक्षा कमी असेल किंवा
- तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज नवीन टॅक्स रेजिम नुसार ५० हजार पेक्षा जास्त पण ४ लाखांपेक्षा कमी असेल
तरच तुम्हाला फॉर्म १५जी भरता येईल.
मात्र तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात ५० हजार पेक्षा कमी असेल तर तुम्हाला फॉर्म १५जी भरण्याची गरज नाही.
तसंच तुम्हाला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिम च्या पहिल्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फॉर्म १५जी भरून काहीही उपयोग होत नाही. तुमच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू केलाच जातो.
फॉर्म १५एच कोण भरू शकतो
जेष्ठ नागरिक
- तुम्ही जेष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय ६० पेक्षा जास्त असेल
- तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिम नुसार १ लाखापेक्षा जास्त आणि तीन लाखांपेक्षा कमी असेल किंवा
- नवीन टॅक्स रेजिम नुसार १ लाखापेक्षा जास्त आणि ४ लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला फॉर्म १५एच भरता येईल.
सुपर सिनियर सिटीझन
- आणि, जर तुम्ही सुपर सिनियर सिटीझन असाल म्हणजे तुमचं वय ८० किंवा त्यापेक्षा जास्त असेल
- तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिम नुसार १ लाखापेक्षा जास्त आणि ५ लाखांपेक्षा कमी असेल किंवा
- नवीन टॅक्स रेजिम नुसार १ लाखापेक्षा जास्त आणि ४ लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला फॉर्म १५एच भरता येईल.
मात्र तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात १ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फॉर्म १५एच भरण्याची गरज नाही.
तसंच तुम्हाला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिम च्या पहिल्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त असेल तर तुम्ही फॉर्म १५एच भरून काहीही उपयोग होत नाही. तुमच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू केलाच जातो.
तर अशाप्रकारे आपण फॉर्म १५जी किंवा १५एच भरून एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा ते बघितलं.
ठेवी एकाच बँकेत न ठेवता वेगवेगळ्या बँकात ठेवाव्यात
मंडळी, हा सुद्धा एक सोपा आणि चांगला पर्याय आहे. इथे आम्ही एका बँकेत सगळ्या ठेवी न ठेवणे असा उल्लेख केला आहे कारण रिझर्व बँकेच्या नियमानुसार
एकाच बँकेत मग वेगवेगळ्या शाखांमध्ये मध्ये जरी आपण ठेवी ठेवल्या तरी त्या सगळ्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका व्यक्तीच्या नावावर जमा केली जाते आणि जर ते एकूण व्याज नियोजित मर्यादेपेक्षा जास्त झालं तर त्या एकत्रित व्याजाच्या रकमेवर तर टीडीएस लागू होईल.
म्हणजे सामान्य नागरिकांसाठी ५० हजारपेक्षा जास्त आणि जेष्ठ नागरिकांसाठी १ लाखांपेक्षा जास्त अशी ही एकूण व्याजाची रक्कम झाली तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल.
म्हणून एकाच बँकेत ठेवींमध्ये पैसे गुंतवणूक न करता वेगवेगळ्या बँकांमध्ये
उदा. स्टेट बँके, महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिस अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करावी
आणि गुंतवणूक करताना काळजी घ्यावी कि प्रत्येक बँकेत तेवढीच रक्कम ठेवींमध्ये ठेवावी ज्याचं व्याज प्राप्तिकर विभागाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही.
म्हणजे सामान्य नागरिकांसाठी ५० हजारपेक्षा जास्त आणि जेष्ठ नागरिकांसाठी १ लाखांपेक्षा होणार नाही. असं नियोजन केल्यामुळे बँक आपल्या ठेवीच्या व्याजावर टीडीएस कपात करू शकणार नाही आणि ते पैसे आपल्याला वापरता येतील.
तर ही होती दुसरी पद्धत ज्याचा उपयोग करून आपण एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा ते बघितलं.
आर्थिक वर्षाच्या मधेच एफडी करावी
मंडळी, रिझर्व बँकेच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात मिळालेल्या व्याजाची रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कपात केली जाते.
पण आर्थिक वर्ष म्हणजे काय तर कुठल्याही वर्षातील १ एप्रिल ते त्याच्या पुढील वर्षातील ३१ मार्च पर्यंत चा कालावधी म्हणजे एक आर्थिक वर्ष.
उदा.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ हे एक आर्थिक वर्ष झालं आणि या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही जे व्याज ठेवींद्वारे मिळवलं असेल ते दिलेल्या नियमांपेक्षा जास्त झालं तर त्यावर टीडीएस लागू केला जातो.
पण जर तुम्ही कुठल्याही आर्थिक वर्षाच्या मधेच म्हणजे साधारणपणे सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जर ठेवींमध्ये पैसे गुंतवले तर त्या ठेवींवर पूर्ण वर्षाचं व्याज लागू होणार नाही.
उदा.
जर तुम्ही १ ऑक्टोबर २०२५ रोजी एखाद्या मुदत ठेवींमध्ये ८% व्याजदराने १२ लाख रु ची गुंतवणूक केली तर त्याचं १२ महिन्यांसाठीचं व्याज ९६ हजार रुपये असेल. पण गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात केल्यामुळे त्या ठेवीमधून तुम्हाला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑक्टोबर ते मार्च या ६ महिन्यांसाठी ४८ हजार रु एवढं व्याज मिळेल.
मार्च महिना आपण अशासाठी धरला कारण प्रत्येक मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपतं.
- आता सामान्य ठेवीदारांची टीडीएस ची मर्यादा नवीन नियमानुसार ५० हजार करण्यात आली आहे आणि आपल्या उदाहरणानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तुम्हाला आपल्या उदाहरणातील मुदत ठेवीवर ४८ हजार रु व्याज मिळालं आहे. त्यामुळे बँक या व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागू करणार नाही.
- तसेच पुढील आर्थिक वर्षात सुद्धा १ एप्रिल २०२६ ते १ सप्टेंबर २०२६ या ६ महिन्यांसाठी पुन्हा ४८ हजार एवढंच व्याज मिळेल जे टीडीएसच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे त्यावर टीडीएस कपात केली जाणार नाही. अशा प्रकारे आपण टीडीएस कपात टाळू शकतो.
फक्त हा पर्याय वापरताना सुद्धा तुम्हाला २ गोष्टींची काळजी घ्यावी लागेल कि
- एका बँकेत ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवी ठेऊ नयेत. आणि गुंतवणूक करताना आर्थिक वर्षात व्याज किती मिळते ते नक्की बघा आणि ते व्याज मर्यादेपेक्षा कमी होईल याची काळजी घ्या म्हणजे त्या हिशोबानेच गुंतवणूक करा म्हणजे टीडीएस कपात होणार नाही
- गुंतवणूक कमी कालावधीसाठी म्हणजे १२ ते १४ महिन्यांसाठी करावी. कारण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास अनेकदा चक्रवाढ पद्धत लागू होते आणि दरवर्षी व्याजाची रक्कम सुद्धा वाढत जाते आणि साधारण दोन वर्षानंतर ती व्याजाची रक्कम टीडीएस कपातीसाठी पात्र ठरू शकते.
तर मंडळी अशा प्रकारे आपण आजच्या लेखामध्ये एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा हे बघितलं. पण समजा काही कारणांनी आपल्या एफडीवर टीडीएस कपात झाली तर मात्र आपल्याला आयकर विवरणपत्र भरावं लागतं कारण त्याशिवाय ही टीडीएस ची रक्कम जी आयकर खात्याकडे गेलेली असते ती आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळे आत्ता आपण बघितलेले एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा याचे तीन पर्याय आपण पुन्हा एकदा नीट समजून घ्या आणि त्यांचा नक्की उपयोग करून बघा.

