५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही | No TDS on Fixed Deposit 2025

मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही

मंडळी, तुम्हाला ५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही भरावा लागला तर? म्हणजे तुमचं मुदत ठेवींच्या व्याजाचं उत्पन्न जरी भरपूर असलं म्हणजे अगदी लाखांमध्ये उत्पन्न असलं तरी त्यावर ना टीडीएस कपात केली जाईल ना त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल.

आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत, नवीन आर्थिक वर्षांमध्ये म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुदत ठेवींच्या बाबतीत जे बदल लागू होणार आहेत त्याचा फायदा घेऊन टीडीएस मध्ये आणि प्राप्तिकरातही बचत कशी करता येईल. थोडक्यात मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही. 

मंडळी, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर २ बदल लागू होणार आहेत आणि प्राप्तिकराच्या बाबतीत नवीन टॅक्स रेजिम साठी असलेल्या टॅक्स स्लॅब मध्ये बदल होणार आहेत. ज्यांचा फायदा करदात्यांना खासकरून मध्यमवर्गीय करदात्यांना होणार आहे.

टीडीएस कपातीच्या मर्यादेत झालेले बदल

मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएसच्या संदर्भात जे २ बदल लागू होणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सामान्य करदात्यांना मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपातीची मर्यादा ४० हजार रु होती ती वाढवून आता नवीन आर्थिक वर्षात ५० हजार करण्यात येणार आहे.
    थोडक्यात, सामान्य करदात्यांना म्हणजे ६० पेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना जर मुदत ठेवीवर एका आर्थिक वर्षात ५० हजार पेक्षा जास्त व्याज मिळालं तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल.
  • जेष्ठ नागरिक असणाऱ्या करदात्यांसाठी मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपातीची मर्यादा ५० हजार रु होती ती वाढवून आता नवीन आर्थिक वर्षात १ लाख करण्यात येणार आहे.
    थोडक्यात, सामान्य करदात्यांना म्हणजे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना जर मुदत ठेवीवर एका आर्थिक वर्षात १ लाख पेक्षा जास्त व्याज मिळालं तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल.

आणि हे दोन्ही नियम १ एप्रिल २०२५ पासून मिळणाऱ्या व्याजावर लागू केले जाणार आहेत.

टीडीएस कपातीची कमाल मर्यादा

यात अजून एक महत्वाचा बदल म्हणजे जरी तुमचं व्याज नवीन नियमांनुसार एका आर्थिक वर्षात आत्ता सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल म्हणजे

  • सामान्य नागरिकांसाठी ५० हजार पेक्षा जास्त आणि
  • जेष्ठ नागरिकांसाठी १ लाखापेक्षा जास्त होत असेल
  • पण ४ लाखांपेक्षा कमी होत असेल

तर तुम्ही फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच भरून टीडीएस कपात टाळू शकता.

फॉर्म १५जी हा ६० पेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो आणि फॉर्म १५एच हा ६० पेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना टीडीएस कपात टाळण्यासाठी भरावा लागतो.
म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलेल्या मुदत ठेवीवर जरी एका आर्थिक वर्षात ४ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळालं तरी त्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही. 

नवीन टॅक्स रेजिम च्या टॅक्स स्लॅबमधे झालेले बदल

मंडळी, नवीन टॅक्स रेजिम च्या टॅक्स स्लॅबमधे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये

  • पहिल्या ४ लाखांपर्यंत च उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.
  • त्यानंतर १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जरी प्राप्तिकर लागू होत असेल तरी त्यावर रिबेट किंवा सवलत दिली जाणार आहे.

थोडक्यात, १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न सुद्धा करमुक्तच म्हणावं लागेल.

नवीन करप्रणाली
वार्षिक उत्पन्न टक्केवारी
० ते ४,००,००० ०%
४,००,००१ ते ८,००,००० ५%
८,००,००१ ते १२,००,००० १०%
१२,००,००१ ते १६,००,००० १५%
१६,००,००१ ते २०,००,००० २०%
२०,००,००१ ते २४,००,००० २५%
२४ लाखांपेक्षा जास्त ३०%

तर आत्ता आपण टीडीएस कपातीच्या आणि प्राप्तिकराच्या बाबतीत जे बदल बघितले त्यांचा फायदा घेऊन ५० लाखांच्या मुदत ठेवीवर जेवढं व्याज मिळेल ते करमुक्त कसं होईल ते बघणार आहोत.

मंडळी खरतर ५० लाख ही खूप मोठी रक्कम आहे. पण आपण जास्तीत जास्त रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा टीडीएस कपात कशी टाळता येईल हे बघण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेचं उदाहरण घेतलं आहे. याचाच दुसरा अर्थ असा होतो कि यापेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवर जे व्याज मिळेल ते निश्चितच टीडीएस मुक्त असेल.

तर आधी आपण बघूया आपल्याला एका आर्थिक वर्षात ५० लाख रु च्या ठेवीवर किती व्याज मिळेल?

५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही

मंडळी, जर तुम्ही कुठल्याही सरकारी बँकांमध्ये मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवले तर त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त ८% दराने परतावा मिळेल. हा ८% एवढा परतावा चक्रवाढ पद्धतीने मिळेल असं गृहीत धरलं आहे. कारण सरकारी बँकांमध्ये साधारण पणे ७.५०% पर्यंत व्याजदर मिळतो आणि त्या व्याजावर जर चक्रवाढ पद्धत गृहीत धरली तर ते व्याज जास्तीत जास्त ८% पर्यंत परतावा देऊ शकतं.

आता जर तुम्ही एखाद्या सरकारी बॅंकेमध्ये ८% व्याजदराने ५० लाख रु गुंतवले तर त्यावर तुम्हाला ४ लाख एवढं व्याज एका आर्थिक वर्षात मिळेल.

पण मग याचा फायदा कसा होईल तर

  • जर तुम्ही नवीन टॅक्स रेजिम मध्ये बदललेले टॅक्स स्लॅब बघितले जे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहेत तर त्यामध्ये
    पहिल्या ४ लाखांपर्यंत च्या उत्पन्नावर तुम्हाला एकही रुपया प्राप्तिकर भरावा लागणार नाही. याचाच  अर्थ असा होतो की तुम्हाला ५० लाखांवर मिळणाऱ्या ४ लाख रुपयांच्या व्याजावर प्राप्तिकर भरावा लागणार नाही.
  • जर तुम्ही टीडीएस च्या बाबतीत मगाशी सांगितलेला नियम बघितला तर तुम्हाला कळेल कि

तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात ४ लाखांपर्यंत होत असेल तर तुम्ही टीडीएस कपात टाळू शकता.
मात्र त्यासाठी तुम्ही फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच भरून टीडीएस कपात टाळू शकता.

फॉर्म १५जी हा ६० पेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो आणि फॉर्म १५एच हा ६० पेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो.

थोडक्यात, तुमच्या लक्षात आलं असेल कि जरी मुदत ठेव ५० लाखांची असली आणि त्यावर व्याज ४ लाख रुपये मिळत असलं तरी त्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही.

आता आपण अजून एक उदा घेऊ. ज्यामध्ये आपण बघूया की जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही जेष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली तर त्याबाबतीत आकडेमोड कशी होईल?

जेष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक

मंडळी, इथंसुद्धा आपण ५० लाखांच्याच गुंतवणुकीच्या रकमेचं उदाहरण घेणार आहोत. पण सगळ्यात आधी आपल्याला जेष्ठ नागरिक बचत योजनेचे दोन नियम समजून घ्यावे लागतील की

  • जेष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रु एवढीच गुंतवणूक करता येते.
  • जेष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ८.२% एवढा आहे.

त्यामुळे जर तुम्ही जेष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल रकमेची ३० लाख रु एवढी गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला ८.२% व्याजदराने २,४६,००० रु एवढं व्याज एका आर्थिक वर्षात मिळेल.

आणि जर तुम्ही उरलेली गुंतवणूक म्हणजे ५० लाखांपैकी उरलेल्या २० लाख रुपयांची गुंतवणूक एखाद्या सरकारी बँकेत मुदत ठेवींमध्ये केलीत आणि त्यावर तुम्हाला ८% व्याजदराने १,६०,००० रु व्याज एका आर्थिक वर्षात मिळेल. म्हणजे एकूण व्याज एका आर्थिक वर्षात ४,०६,००० होईल.

फक्त या दोन्ही गुंतवणुकी करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की दोन्ही गुंतवणुकी वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागतील.

उदा. जेष्ठ नागरिक बचत योजना पोस्टमध्ये आणि २० लाखांची मुदत ठेव कुठल्याही सरकारी बँकेत करावी लागेल. म्हणजे दोन्हीकडे तुमचं व्याज ४ लाखांपेक्षा कमी आहे अशी नोंद होईल.

आता या बाबतीत दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला फॉर्म १५एच भरून टीडीएस कपात टाळता येईल. त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात होणार नाही.

आणि जर दोन्ही व्याजाच्या रकमांची बेरीज केली तर ती बेरीज म्हणजे जेष्ठ नागरिक बचत योजनेत मिळालेलं व्याज २,४६,००० + सरकारी बँकेत मिळालेलं व्याज १,६०,००० म्हणजे एकूण ४,०६,००० रु होईल.

इथे तुम्हाला ४ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे त्यामुळे ही रक्कम करपात्र होईल.

मात्र आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून १२ लाखांपर्यंत च्या उत्पन्नावर जेवढा टॅक्स होईल त्यावर रिबेट मिळणार आहे. त्यामुळे जरी तुमचं उत्पन्न ४,०६,००० होत असेल तरी त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त तुम्हाला आयकर विवरणपत्र मात्र सादर करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला टॅक्स रिबेट मिळेल. आणि तुमचं उत्पन्न करमुक्त होईल.

त्यामुळे इथंसुद्धा तुम्हाला जेष्ठ नागरिक बचत योजनेत आणि मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही.

 

पण आता इथं एक प्रश्न विचारला जातो कि

मुदत ठेवींशिवाय इतर उत्पन्न असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागेल का?

तर मंडळी, तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा इतर मार्गानी उत्पन्न मिळत असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला प्राप्तिकराच्या रकमेत बचत करता येईल. इथं सुद्धा तुम्हाला टॅक्स रिबेट च्या मदतीने टॅक्समध्ये बचत करता येईल.

याबाबतीत जर तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून ४,००,००० रुपये मिळत असतील आणि तुमचं इतर उत्पन्न एका आर्थिक वर्षात ८ लाख रु पर्यंत होत असेल तरी या दोन्ही उत्पन्नाची बेरीज १२ लाख रु होते आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून १२ लाख रु पर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.

फक्त याबाबतीत सुद्धा तुम्हाला आयकर विवरणपत्र मात्र सादर करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला टॅक्स रिबेट मिळेल आणि तुमचं १२ लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त होईल.

तसंच जर तुम्ही नोकरी किंवा पेन्शन द्वारे उत्पन्न मिळवत असाल तर तुम्हाला अजून ७५ हजार रु सवलत मिळेल ज्याला स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणतात. म्हणजे तुमचं उत्पन्न १२,७५,००० रु असलं तरी ते उत्पन्न करमुक्त होईल.

तर मंडळी अशा प्रकारे जरी तुम्हाला फक्त मुदत ठेवींवर मिळणारं व्याज ४ लाख रु जरी असेल तरी त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही आणि जरी त्याशिवाय जास्तीचं उत्पन्न असलं आणि ते उत्पन्न १२ लाख एवढं असलं तरी ते करमुक्त होऊ शकतं. फक्त इथं तुम्हाला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल –

  • तुम्हाला आयकर विवरण पत्र भरावं लागेल
  • तुम्हाला त्यासाठी नवीन टॅक्सरेजिम निवडावा लागेल.

आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन आर्थिक वर्षाची वाट बघावी लागेल कारण हे सगळे नियम नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहेत.

तर मंडळी आज या लेखामधून आपण बघितलं कि तुम्ही तुमच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही हे नियोजन कस करू शकता. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर कृपया इतरांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *