शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्टॉक कसा ओळखायचा? हा प्रश्न नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांना नेहमी पडतो. कुठल्याही कंपनीचा शेअर खरेदी करण्याआधी त्या कंपनीचं व्यवस्थितपणे विश्लेषण करावं लागतं.
कंपनीचं विश्लेषण करावं लागतं म्हणजे कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी लागते ज्यामुळे आपल्याला त्या कंपनीचा शेअर घेऊन किती फायदा होईल हे लक्षात येतं. आणि जर आपण कुठलीही माहिती मिळवल्याशिवाय शेअर्स मध्ये गुंतवणूक केली तर कदाचित आपली गुंतवणूक बुडण्याचा किंवा नुकसानीत जाण्याचा संभव असतो.
त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तरी तुम्हाला प्राथमिक माहिती असणं अनिवार्य आहे आणि शेअर्स ची निवड करताना तर संबंधित कंपनीचं विश्लेषण करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे.
कंपनीचं विश्लेषण करण्याचे प्रकार
कंपनीचं विश्लेषण करण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत
- तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis)
- मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis)
सामान्यपणे तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) उपयोग डे ट्रेडिंग साठी करतात. डे ट्रेडिंग म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतला त्याच दिवशी तो विकायचा.
आणि मुलभूत विश्लेषणाचा (Fundamental Analysis) उपयोग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो.
आज आपण मुलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) या प्रकारची माहिती घेणार आहोत.
मुलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) म्हणजे काय?
मूलभूत विश्लेषण म्हणजे कंपनीच्या वेगवेगळ्या घटकांचा व्यवस्थिपणे अभ्यास करून ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का नाही ते बघणे तसंच भविष्यात ती कंपनी आपल्याला फायदेशीर ठरेल का नाही हे ठरवणे.
- कंपनीचं मूलभूत विश्लेषण करताना
- कंपनीच्या उत्पन्नाची माहिती,
- जमा खर्च,
- रोखीचे व्यवहार किंवा कॅश फ्लो,
- कंपनीची मागील काही वर्षातील कामगिरी,
- कंपनीची कमाई, नफा,
- कंपनीवर काही कर्ज आहेत का? आणि
- कंपनीचं व्यवस्थापक मंडळ कसं आहे
असे अनेक पैलू विचारात घेतले जातात तसंच त्या पैलूंचा सखोल अभ्यास केला जातो.
तसंच बाजारातील अनेक घटक जसे चलनवाढ, GDP, बाजाराचा आणि गुंतवणूक दारांचा कुठे कल आहे अशा घटकांचा अभयास केला जातो आणि त्यावरून संबंधित कंपनीवर त्या घटकांचा काय परिणाम होईल हे सुद्धा तपासलं जातं.
सर्वोत्तम स्टॉक कसा ओळखायचा?
मूलभूत विश्लेषण म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया –
समजा तुम्ही एखादी जमीन विकत घेताय. अशा वेळी तुम्ही अनेक गोष्टी तपासता. सगळ्यात पहिली तपासणी म्हणजे
जमिनीचे कागदपत्र आणि मालक खरा आहे का हे बघितलं जातं. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत हे कळल्यावर मग
- जमिनीचं लोकेशन,
- आजूबाजूचा परिसर,
- त्यातून काही धोके निर्माण होतील का?,
- भविष्यात जमिनीची किंमत किती वाढेल,
- आजूबाजूला वीज, पाणी, रस्ते अशा प्राथमिक सोयी आहेत का?
अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात.
थोडक्यात, सौदा फायद्याचा आहे का तोट्याचा आहे हे अगदी तपशीलवार बघितलं जातं.
मूलभूत विश्लेषण म्हणजे हेच असतं फक्त इथं आपण कंपनीची माहिती घेणार आहोत त्यामुळे त्यासाठी आपण काही कसोट्या लावून तपासतो.
त्यामध्ये
- इंट्रिसिक व्हॅल्यू म्हणजे शेअरची खरी किंमत किती आहे,
- पीई रेशो,
- पीबी रेशो,
- कंपनीवर कर्ज किती आहे,
- करंट रेशो म्हणजे कंपनीची मालमत्ता आणि देणी यातला फरक किती आहे,
- एकूण उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न किती आहे,
- जमाखर्च किंवा बॅलन्सशीट,
- प्रमोटर होल्डिंग किती आहे?
प्रमोटर होल्डिंग म्हणजे कंपनीच्या संस्थापक, प्रमुख शेअरहोल्डर आणि कंपनीच्या स्थापनेत महत्त्वाच्या व्यक्तींकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सच्या ची संख्या दाखवते, तसंच
- ते शेअर्स तारण ठेवले आहेत का? आणि
- कॅश फ्लो किती आहे?
या गोष्टी तपासून बघाव्या लागतात.
या सगळ्या कसोट्यांची माहिती आपण पुढील काही लेखामध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे आत्ता तुम्ही फक्त त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
मूलभूत विश्लेषणाचे प्रमुख प्रकार
गुणात्मक विश्लेषण (Qualitative Analysis)
या प्रकारामध्ये
- कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे,
- कंपनीचा ब्रँड किती मोठा आणि प्रतिष्ठित आहे
- कंपनीच्या ब्रॅण्डचा लोकांवर किती प्रभाव आहे
ते तपासलं जात आणि तसंच कंपनीची स्पर्धा कुणाशी आहे आणि त्यात कंपनीची पत किती आहे यासारख्या पैलूंचे मूल्यांकन केलं जातं. हे घटक कंपनीबद्दल गुंतवणूकदारांचा मतप्रवाह तयार करण्यात महत्वपूर्ण काम करतात ज्याचा कंपनीला भविष्यात फायदा होतो.
उदा. टाटा कंपनीची नवीन गाडी लॉन्च झाली कि टाटांच्या नावावर गाडी हातोहात खपते. म्हणजे गाडी वाईट असते असं नाही पण टाटा हा एक मोठा ब्रँड आहे. त्यामुळे लोकांच्या त्यांच्याप्रती एक विश्वास निर्माण झाला आहे आणि तेच कंपनीचं ब्रॅण्डिंग मटेरियल आहे.
परिमाणवाचक विश्लेषण (Quantitative Analysis)
परिमाणवाचक विश्लेषण म्हणजे ज्या गोष्टी मोजता येतात अशा प्रकारच्या पैलूंच विश्लेषण. या प्रकारच्या विश्लेषणात ज्या गोष्टीचा हिशोब ठेवता येतो अशा गोष्टींचं विश्लेषण केलं जातं. यामध्ये
- जमाखर्च,
- उत्पन्नाचे अहवाल,
- रोखीने केलेल्या व्यवहारांचे हिशोब आणि
- वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबींचा समावेश आहे.
थोडक्यात,या प्रकारच्या विश्लेषणामुळे गुंतवणूकदार कंपनीच्या आर्थिक स्थितीचं आणि कामगिरीचे मूल्यांकन करू शकतात.
मूलभूत विश्लेषण करायचं कशाला ?
याची प्रामुख्याने ३ कारणे आहेत
१) शेअरची किंमत ठरवता येते
फन्डामेन्टल ॲनालिसिसद्वारे आपण कंपनीच्या शेअरची वाजवी किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. शेअर मार्केटच्या भाषेत यालाच इन्ट्रींझिक व्हॅल्यू (Intrinsic Value) म्हणजे खरी किंमत असे म्हणतात.
कंपनीच्या शेअरची खरी किंमत ठरवल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं कि आपण चालू भावात शेअर घेणं फायद्याचं ठरेल कि तोटा होईल. कारण अनेकदा शेअरच्या किमतीत फुगवटा निर्माण झालेला असतो त्यामुळे अचानक शेअरचा भाव कोसळू शकतो आणि गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकत. म्हणूनच शेअरची किंमत ठरवणे हे अतिशय महत्वाचं ठरतं.
२) शेअरचा चालू बाजारभाव योग्य आहे कि नाही ते ठरवता येतं
मंडळी, शेअरची योग्य किंमत आणि शेअरचा चालू बाजारभाव वेगवेगळे असू शकतात. यातूनच शेअरचा चालू बाजारभाव कमी आहे की जास्त ते ठरवून कंपनीत गुंतवणूक करायची कि नाही ते ठरवलं जाऊ शकतं. कारण अनेकदा खूप जास्त किंवा कमी भाव असण हे सुद्धा गुंतवणुकीसाठी धोक्याचं असतं.
अतिरिक्त जास्त भाव हा मगाशी बघितल्याप्रमाणे फुगवटा असू शकतो. तसंच खूप कमी भाव म्हणजे कंपनीच्या व्यवसायात किंवा कामगिरीत काहीतरी गडबड असू शकते किंवा इतर काही कारण असू शकतं ज्यामुळे शेअर्स चा भाव खूप कमी होतो आणि हे आपण फन्डामेन्टल ॲनालिसिसद्वारे जाणून घेऊ शकतो.
३) कंपनीची भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावता येतो
फन्डामेन्टल ॲनालिसिसचा उपयोग करून कंपनीची वर्तमान माहिती आणि कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती वापरून कंपनीच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसंच फन्डामेन्टल ॲनालिसिसचा उपयोग करून गुंतवणूकदारांना कंपनीचा दीर्घकालीन कल समजून घेता येतो आणि गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या सुद्धा ओळखण्यासाठी मदत होऊ शकते.
तर मंडळी आज आपण थोडक्यात बघितलं फंडामेंटल अनालिसिस किंवा मूलभूत विश्लेषण म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग करून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्टॉक कसा ओळखायचा?
मात्र, फंडामेंटल अनालिसिस करणं ही एक बऱ्यापैकी मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे ती आपण एका लेखामध्ये शिकणं थोडं अवघड जाईल. त्यामुळे आपण पुढील काही लेखांमध्ये या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती घेऊ.
पण आपल्या शेअर मार्केटच्या या मालिकेत आपण पुढील काही भागांमध्ये प्रत्येक पैलूंचा अगदी सविस्तर उदाहरणासकट अभ्यास करणार आहोत त्यामुळे आपल्या ब्लॉग चे सदस्य व्हा म्हणजे तुम्ही सुद्धा हळूहळू शेअर मार्केट मध्ये एक्सपर्ट व्हाल आणि मग तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गुंतवणुकीतून सुद्धा फायदा कसा मिळतो हे आपोआपच कळायला लागेल.
तर मंडळी आज आपण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्टॉक कसा ओळखायचा? याची प्राथमिक माहिती घेतली. आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये नक्की लिहा हा लेख आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि आपल्या INVESTO मराठी या ब्लॉगचे मेम्बर व्हा म्हणजे आम्ही असेच नवनवीन लेख नियमितपणे घेऊन येत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.

