आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? | what is health insurance in marathi

आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे

आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? हा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो कारण भारतात अजूनही आरोग्य विमा किंवा Health Insurance विषयी आवश्यक तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही. तसंच समाजामध्ये अजूनही आरोग्य विमा हा एक अनावश्यक खर्च समजला जातो आणि टाळला जातो.

मंडळी, आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? हा प्रश्न अनेकांना पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे आरोग्य विमा म्हणजे काय आणि त्याचे काय काय फायदे आहेत? हेच अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे या प्रश्नाचं अगदी सविस्तर उत्तर आज बघणार आहोत. त्याचबरोबर इतर संबंधित प्रश्नाची उत्तरं सुद्धा आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

आरोग्य विमा म्हणजे काय?

आरोग्य विमा किंवा Health Insurance हा विमा म्हणजे Insurance चा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये विमाधारक व्यक्तीला जर काही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचा खर्च आला तर ती खर्चाची रक्कम संबंधित विमा कंपनी देते.

थोडक्यात, जर एखाद्या व्यक्तीने आरोग्य विमा काढला असेल आणि त्या व्यक्तीला काही आजार झाला किंवा एखादं ऑपरेशन करावं लागलं तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम त्या व्यक्तीला भरावी लागत नाही. ती रक्कम संबंधित विमा कंपनी देते.

आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे?

मंडळी, औषधोपचार किंवा वैद्यकीय खर्च वर्षानुवर्षे वाढत आहेत. हे खर्च सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हॉस्पिटलची बिलं तर हल्ली लाखांमध्येच असतात. अशावेळी ज्यांच्याकडे एवढे पैसे नसतील त्यांना उपचार घेणं कठीण झालं आहे. आणि पैसे नसल्यामुळे उपचाराअभावी काही अघटित घडू नये म्हणून आरोग्य विमा हा योग्य उपाय आहे.

याबाबतीत अनेकदा ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा आरोग्य विमा नसल्यामुळे त्यांची सगळी आर्थिक बचत किंवा गुंतवणूक वैद्यकीय उपचारांसाठी खर्च होते आणि त्यामुळे त्यांचं भविष्य असुरक्षित होतं. त्यांना पुन्हा नव्याने बचत किंवा गुंतवणूक सुरु करावी लागते.

तसंच, आरोग्य विमा भरमसाट वैद्यकीय खर्चांपासून आपला बचाव करू शकतो.

उदाहरणार्थ, काही आरोग्य विमा योजनांमध्ये ३० प्रकारचे गंभीर आजार आणि ८० हून अधिक शस्त्रक्रियांचा समावेश होतो. त्यामुळे अशा प्रकारचे उपचार गरज पडल्यास आपण आरोग्य विम्यामुळे करून घेऊ शकतो.

थोडक्यात, आरोग्य विम्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने आणि पैशाच्या दृष्टीने अधिक सुरक्षितता मिळते. यामुळेच आरोग्य विमा पॉलिसी अतिशय गरजेची आहे, विशेषत: कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी अतिशय आवश्यक आहे.

आरोग्य विम्यामध्ये अनेक प्रकारच्या कव्हरेजचा समावेश होतो किंवा अनेक प्रकारचं विमा संरक्षण मिळतं. या संबंधी माहिती आपण पुढे बघणारच आहोत. पण आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? हे बघितल्या नंतर आपण आरोग्य विम्याचे किती प्रकार आहेत ते बघूया.

आरोग्य विम्याचे प्रकार

आरोग्य विम्याचे ढोबळ मानाने ७ प्रकार आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यांच्या गरजही अर्थातच वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अशा गोष्टी लक्षात घेऊनच आरोग्य विम्याचे प्रकार तयार करण्यात आले आहेत.

  • वैयक्तिक आरोग्य विमा
  • कौटुंबिक आरोग्य विमा
  • ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा
  • मातृत्व आरोग्य विमा
  • गंभीर आजारासाठीचा आरोग्य विमा
  • गट आरोग्य विमा किंवा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स
  • टॉप अप आरोग्य विमा

१. वैयक्तिक आरोग्य विमा

यालाच इंडिविज्युअल हेल्थ इन्शुरन्स असंही म्हणतात. वैयक्तिक आरोग्य विमा एका व्यक्तीसाठी असतो. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने विमा असेल त्याच व्यक्तीचा वैद्यकीय खर्च वैयक्तिक आरोग्य विम्याद्वारे होऊ शकतो. यामध्ये हॉस्पिटल चा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या यासह अनेक प्रकारचे वैद्यकीय खर्च समाविष्ट आहेत.

२. कौटुंबिक आरोग्य विमा

याला फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स असही म्हणतात. या प्रकारच्या वैद्यकीय विम्यामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण मिळतं. म्हणजे या प्रकारात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला जातो आणि गरजेनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय गोष्टींसाठी लागणार खर्च म्हणजे हॉस्पिटल चा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या असे खर्च इन्शुरन्स कंपनी द्वारे केले जातात.

३. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा

या आरोग्य विम्यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन त्यानुसार हा प्रकार तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतर वैद्यकीय खर्चांबरोबरच या पॉलिसी अतिरिक्त फायदा देतात, ज्यामध्ये डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याऐवजी घरीच उपचार घेणे किंवा मानसोपचार घेणे असे खर्च सुद्धा या विम्यामधून मिळू शकतात.

मात्र, जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता जास्त असल्याने, या प्रकारच्या विमा योजनांसाठी आधी संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक असू शकते आणि नियमित विमा पॉलिसींपेक्षा या थोड्या जास्त महाग असू शकतात

४. मातृत्व आरोग्य विमा

या प्रकारच्या विम्यामध्ये प्रसूतीशी संबंधित हॉस्पिटलचा खर्च कव्हर केला जातो. बाळाच्या जन्माच्या ३० दिवस आधी आणि प्रसूतीनंतर ६० दिवसांपर्यंत होणारा खर्च यात समाविष्ट आहे. तसंच मातृत्व आरोग्य विमा नवजात बाळाला सुद्धा विमा संरक्षण देतो. यामध्ये सामान्य प्रसूती तसेच सिझेरियन प्रसूतीसाठी सुद्धा कव्हरेज मिळते. तसंच, गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीच्या वैद्यकीय खर्चाचा सुद्धा यात समावेश होतो.

५. गंभीर आजारासाठीचा आरोग्य विमा

यालाच क्रिटिकल इलनेस कव्हरेज असंही म्हणतात. यामध्ये कर्करोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका तसंच इतर जीवघेण्या आणि गंभीर आजारांसाठी वैद्यकीय कव्हरेजचा समावेश होतो. या विम्यामध्ये गंभीर आजाराचे निदान झाल्यास पॉलिसीधारकाला उपचार आणि वेगवेगळ्या चाचण्यांच्या खर्चासाठी विमा संरक्षण दिलं जातं.

६. गट आरोग्य विमा किंवा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स

गट आरोग्य विमा साधारणपणे मोठमोठ्या कंपन्यांद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केला जातो. ज्यामध्ये संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश केलेला असतो.

या प्रकारची विमा पॉलिसी हॉस्पिटल चा खर्च, वैद्यकीय चाचण्या, शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी होणारा खर्च यासाठी विमा संरक्षण देते.

७. टॉप अप आरोग्य विमा

टॉप अप आरोग्य विमा आपल्या चालू आरोग्य विमा पॉलिसीच्या शिवाय अतिरिक्त कव्हरेज किंवा विमा संरक्षण देतो.

म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ५ लाखाचा वैद्यकीय विमा आहे. त्या व्यक्तीची ५ लाखाची विम्याची मर्यादा तपासण्या, उपचार किंवा इतर काही कारणानी संपली आणि त्याला अजून जास्त खर्च येतो आहे अशा वेळी त्या व्यक्तीला टॉप अप आरोग्य विमा उपयोगी पडतो. ज्यामुळे ती जास्तीची रक्कम सुद्धा विमा कंपनी देते.

तर हे होते आरोग्य विम्याचे काही प्रकार. आता बघूया आरोग्य विम्याचे काही फायदे.

आरोग्य विम्याचे फायदे

वाढत्या वैद्यकीय खर्चाची तरतूद

आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतल्यामुळे सतत वाढत जाणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून आपलं आर्थिक संरक्षण होते. अपघात किंवा अचानक उदभवणारे वैद्यकीय खर्च यामधून तुम्हाला वैद्यकीय विम्यामुळे दिलासा मिळतो. वैद्यकीय विम्यामध्ये वैद्यकीय खर्चांबरोबरच, रुग्णवाहिकेच्या शुल्कापासून ते डेकेअर प्रक्रियेपर्यंत सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण मिळतं.

२४ तासांपेक्षा कमी वेळ जे उपचार घेतो त्याला डेकेअर प्रक्रिया म्हणतात.

गंभीर आजारांसाठी अतिरिक्त खर्चावर विमा संरक्षण

बऱ्याच आरोग्य विमा पॉलिसी गंभीर आजारांसाठी अतिरिक्त खर्चावर विमा संरक्षण देतात. हल्लीच्या जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या वाढत्या घटना पाहता, हे आणखी एक महत्त्वाचे कव्हर आहे. तुम्हाला कव्हर केलेल्या गंभीर आजारांपैकी कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास तुम्हाला एकरकमी भरपाई दिली जाते. या समस्या खर्चाच्या दृष्टीने बऱ्याचदा खूप महाग असतात, त्यामुळे क्रिटिकल इलनेस कव्हर हा आरोग्य विमा असण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे.

कॅशलेस उपचार

वैद्यकीय विम्यासंदर्भात तुम्ही कॅशलेस उपचार असं कधीतरी ऐकलं असेल. याचा अर्थ असा होतो कि अनेक हॉस्पिटल्स मध्ये उपचारांदरम्यान जो खर्च येतो त्यासाठी पेशंटला रोख किंवा चेकद्वारे पैसे भरावे लागतात. मात्र, तुमच्या विम्यामध्ये कॅशलेस ट्रीटमेंट हा पर्याय असेल तर पेशंटला एक रुपया सुद्धा न भरता उपचार मिळतात. फक्त बिलाची रक्कम तुमच्या विम्याचा मर्यादेपेक्षा जास्त झाली तर उर्वरित रक्कम पेशंटला भरावी लागते. तसेच तुम्ही घेत असाल त्या हॉस्पिटलचा विमा कंपनीशी कॅशलेस ट्रीट्मेंट्साठीचा करार झालेला असला पाहिजे.

करात सवलत

लाईफ इन्शुरन्स प्रमाणेच आरोग्य विमा किंवा मेडिकल इन्शुरन्सवर सुद्धा प्राप्तिकरात सवलत मिळते. यामध्ये स्वत:साठी, तुमचा जोडीदार, तुमची मुले आणि ६० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या पालकांच्या विमा पॉलिसीसाठी, तुमच्या करपात्र उत्पन्नातून दरवर्षी २५ हजार रुपये पर्यंतच्या कर कपातीचा दावा तुम्ही करू शकता.

जर तुम्ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पालकांसाठी पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्ही ५० हजार रु पर्यंतच्या अतिरिक्त कर कपातीचा दावा करू शकता. म्हणजे एकूण ७५ हजार रुपयांच्या कर कपातीचा दावा तुम्ही करू शकता.

त्यामुळे आरोग्य विमा किंवा health insurance अनेक प्रकारे फायदेशीर तर असतोच पण त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांच्या उपचारांवर होणाऱ्या मोठ्या खर्चापासून सुटका मिळते आणि आपली बचत किंवा गुंतवणूक अबाधित राहते जी आपल्या भविष्याची तरतूद असते.

तर मंडळी, आज आपण बघितलं आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? आरोग्य विम्याचे प्रकार किती आहेत आणि त्याचे फायदे काय काय आहेत? तेव्हा ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर कमेंटबॉक्स मध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर या लेखामध्ये मिळाली तर कृपया हा लेख तुम्ही इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.

विमा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *