नवीन आर्थिक वर्षात भारतात किती पगार करमुक्त आहे? | Tax free income in fy 2025-26

भारतात किती पगार करमुक्त आहे

मंडळी, आज आपण बघणार आहोत भारतात किती पगार करमुक्त आहे? कारण १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तीन खूप मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या ज्याचा फायदा म्हणून आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून करदात्यांना विशेषतः मध्यमवर्गीय करदात्यांना प्रप्तिकरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सवलत मिळणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेले ३ बदल खालील प्रमाणे आहेत.

  • १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे म्हणजे १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही.
  • नवीन करप्रणालीच्या टॅक्स स्लॅब मध्ये सुद्धा बरेच बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे करदात्यांना प्राप्तिकराच्या रकमेत खूप मोठी सूट मिळणार आहे
  • टीडीएस च्या मर्यादेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.

आणि मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बदल नवीन करप्रणालीमध्ये करण्यात आले आहेत आणि हे तीनही बदल १ एप्रिल २०२५ पासून लागू झालेले आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण भारतात किती पगार करमुक्त आहे? याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण नवीन करप्रणाली मधील टॅक्स स्लॅब मध्ये काय काय बदल झाले आहेत ते बघणार आहोत.

कर स्लॅब बदलले आहेत का?

खालील टेबलमध्ये डावीकडे नवीन टॅक्स रेजिम मधले आर्थिक वर्ष २०२४ – २५ पर्यंतचे टॅक्स स्लॅब्स दिसत आहेत आणि उजव्या बाजूला  नवीन टॅक्स रेजिम मधले आर्थिक वर्ष २०२५ – २६ पासूनचे म्हणजेच सुधारित किंवा नवीन टॅक्स स्लॅब्स दिसत आहेत.

आता आपण जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅब्स मधील फरक बघूया आणि मग त्यानुसार कराची आकडेमोड करून बघूया. त्यामुळे आपल्याला कळेल की नवीन बदलांमुळे प्राप्तिकरदात्यांना किती फायदा होईल.

नवीन करप्रणाली
आर्थिक वर्ष २०२४ – २५ पर्यंत आर्थिक वर्ष २०२५ – २६ पासून
वार्षिक उत्पन्न  कररचना  वार्षिक उत्पन्न  कररचना 
० ते ३ लाख ०% ० ते ४ लाख ०%
३ लाख ते ७ लाख ५% ४ लाख ते ८ लाख ५%
७ लाख ते १० लाख १०% ८ लाख ते १२ लाख १०%
१० लाख ते १२ लाख १५% १२ लाख ते १६ लाख १५%
१२ लाख ते १५ लाख २०% १६ लाख ते २० लाख २०%
१५ लाख पेक्षा जास्त ३०% २० लाख ते २४ लाख २५%
२४ लाख पेक्षा जास्त ३०%

मंडळी, नवीन टॅक्स रेजिममध्ये आर्थिक वर्ष २०२४ – २५ साठी जे टॅक्स स्लॅब आहेत.

त्यामध्ये

  • ० ते ३ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर भरावा लागतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही.
  • ३ ते ७ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर ५ टक्के कर भरावा लागतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ७ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला ५% टॅक्स भरावा लागेल.
  • ७ ते १० लाख दरम्यानच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १० लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला १०% टॅक्स भरावा लागेल.
  • १० ते १२ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर १५ टक्के कर भरावा लागतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला १५% टॅक्स भरावा लागेल.
  • १२ ते १५ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर २० टक्के कर भरावा लागतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १५ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला २०% टॅक्स भरावा लागेल.
  • आणि जर तुमचं उत्पन्न १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३०% टॅक्स भरावा लागेल.

तर हे होते नवीन टॅक्स रेजिम मधले जुने टॅक्स स्लॅब्स जे आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी लागू होतात.

आता टॅक्स स्लॅब्स मध्ये बदल काय झालेत ते बघूया. नवीन नियमानुसार 

  • ० ते ४ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ४ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही.
  • ४ ते ८ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर ५ टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ४ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ८ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला ५% टॅक्स भरावा लागेल.
  • ८ ते १२ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला १०% टॅक्स भरावा लागेल.
  • १२ ते १६ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर १५ टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १६ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला १५% टॅक्स भरावा लागेल.
  • १६ ते २० लाख दरम्यानच्या उत्पन्नावर २० टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न १६ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि २० लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला २०% टॅक्स भरावा लागेल.
  • २० ते २४ लाख दरम्यानच्या उत्पन्नावर २५ टक्के कर भरावा लागेल. म्हणजे जर तुमचं उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त आणि २४ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला २५% टॅक्स भरावा लागेल.
  • आणि जर तुमचं उत्पन्न २४ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३०% टॅक्स भरावा लागेल.

तर मंडळी हे होते बदल जे नवीन टॅक्स रेजिममध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहेत.

१२ लाख करमुक्त कसे?

तर मंडळी, जस नवीन टॅक्स रेजिममध्ये आर्थिक वर्ष २०२४ – २५ ला ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं तसंच आर्थिक वर्ष २०२५ – २६ पासून १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जो काही कर होईल त्यावर रिबेट मिळेल म्हणजे पूर्णपणे सूट मिळेल. मात्र जर १२ लाखांपेक्षा १ रुपया जरी उत्पन्न जास्त असेल तर मात्र नियमित टॅक्स स्लॅब प्रमाणे कर भरावा लागेल.

इथं अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्जिनल रिलीफ. याविषयी आपण पुढील एखाद्या लेखामध्ये सविस्तर माहिती बघू. मार्जिनल रिलीफ मुळे आपल्याला प्राप्तिकरामध्ये अजून थोडी सवलत मिळते

७५ हजार रु ची अतिरिक्त वजावट

मंडळी, नोकरदार करदात्यांसाठी आणि पेन्शनर करदात्यांसाठी १२ लाखांच्या उत्पन्नावर अजून ७५ हजारांचं स्टॅंडर्ड डिडक्शन म्हणजे अतिरिक्त वजावट सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्हाला पेन्शन मिळत असेल आणि तुमचं उत्पन्न १२ लाख ७५ हजार पर्यंत असेल तरी तुम्हाला नवीन टॅक्स रेजिममध्ये आर्थिक वर्ष २०२५ – २६ पासून १२ लाख ७५ हजार पर्यंतच्या उत्पन्नावर सुद्धा एकही रुपया कर भरावा लागणार नाही.

नवीन कर स्लॅब चांगला आहे का?

आता आपण बघूया टॅक्स स्लॅब मधले हे नवीन बदल कशाप्रकारे फायदेशीर ठरणार आहेत. हि तुलना आपण आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील टॅक्स स्लॅब आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील टॅक्स स्लॅब अंतर्गत होणाऱ्या प्राप्तिकराच्या रकमेसाठी करणार आहोत.

यासाठी आपण वेगवेगळ्या रकमा उदाहरण म्हणून घेणार आहोत ज्यातून सगळ्यात आधी

  • ७५ हजाराचं स्टॅंडर्ड डिडक्शन होईल आणि मग
  • उरलेल्या रकमेवर प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅब्स प्रमाणे कराची आकडेमोड केली जाईल.

आता तुलना करण्यासाठी आपण आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या टॅक्स स्लॅबमधील कमाल मर्यादा गृहीत धरणार आहोत.

नवीन कराच्या स्लॅबमधे बदलाचा फायदा

तर आपण समजूया कि

  • वार्षिक उत्पन्न ७७५००० रु आहे.
  • त्यातून ७५ हजार स्टॅंडर्ड डिडक्शन होईल. त्यामुळे उरले ७ लाख रु.
  • आता जुन्या टॅक्स स्लॅब नुसार ‌पहिल्या ३ लाखांवर ०% नि ० रु टॅक्स भरावा लागेल आणि नवीन टॅक्स स्लॅब नुसार या पैकी पहिल्या ४ लाखांवर ०% नि ० रु टॅक्स भरावा लागेल. या टॅक्स स्लॅबमधे १ लाखाची मर्यादा वाढवलेली आहे. म्हणजे ३ लाखांऐवजी ४ लाखांवर टॅक्सची मर्यादा नेलेली आहे.
  • आता जुन्या नियमाप्रमाणे दुसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये ३ ते ७ लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ४ लाख रु वर ५% म्हणजे २० हजार रु टॅक्स होईल. मात्र नवीन नियमानुसार दुसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ४ ते ८ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे उरलेल्या ३ लाख रु वर ५% म्हणजे १५ हजार रु टॅक्स होईल. हे ३ लाख कसे उरले तर पहिल्या टॅक्स स्लॅब मध्ये ४ लाख कमी झाले आणि उत्पन्न ७ लाखांचं त्यामुळे ७ लाख – ४ लाख = ३ लाख. तर या उरलेल्या ३ लाख रु वर दुसऱ्या टॅक्सस्लॅब मध्ये ५% म्हणजे १५ हजार रु टॅक्स होईल.
आर्थिक वर्ष २०२४-२५ आर्थिक वर्ष २०२५-२६
वार्षिक उत्पन्न 775000 वार्षिक उत्पन्न 775000
स्टॅंडर्ड डिडक्शन 75000 स्टॅंडर्ड डिडक्शन 75000
करपात्र उत्पन्न 700000 करपात्र उत्पन्न 700000
० ते ३ लाख (०%) 0 ० ते ४ लाख (०%) 0
३ ते ७ लाख (५%) 20000 ४ ते ८ लाख (५%) 15000
७ ते १० लाख (१०%) 0 ८ ते १२ लाख (१०%) 0
१० ते १२ लाख (१५%) 0 १२ ते १६ लाख (१५%) 0
१२ ते १५ लाख (२०%) 0 १६ ते २० लाख (२०%) 0
१५ लाख पेक्षा जास्त (३०%) 0 २० ते २४ लाख (२५%) 0
२४ लाख पेक्षा जास्त (३०%) 0
प्राप्तिकर 20000 प्राप्तिकर 15000

इथं तुम्ही बघितलंत तर आपल्याला नवीन नियमांनुसार ५ हजार रु टॅक्स कमी पडतो आहे. मात्र जुन्या नियमानुसार ७ लाख आणि नवीन नियमानुसार १२ लाखांपर्यंतच्या उत्पनावर टॅक्स च्या रकमेवर रिबेट मिळतो. त्यामुळे दोन्ही टॅक्स स्लॅब मध्ये उत्पन्न करमुक्त होतं.

नवीन कराच्या स्लॅबमधे बदल

आता आपण समजूया कि

  • वार्षिक उत्पन्न १०,७५,००० रु आहे.
  • त्यातून ७५ हजार स्टॅंडर्ड डिडक्शन होईल. त्यामुळे उरले १० लाख रु.
  • आता जुन्या टॅक्स स्लॅब नुसार या पैकी पहिल्या ३ लाखांवर ०% नि ० रु टॅक्स भरावा लागेल आणि नवीन टॅक्स स्लॅब नुसार या पैकी पहिल्या ४ लाखांवर ०% नि ० रु टॅक्स भरावा लागेल.
  • आता जुन्या नियमाप्रमाणे दुसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये ३ ते ७ लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ४ लाख रु वर ५% म्हणजे २० हजार रु टॅक्स होईल. मात्र नवीन नियमानुसार दुसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ४ ते ८ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे उरलेल्या ४ लाख रु वर ५% म्हणजे २० हजार रु टॅक्स होईल.
  • आता जुन्या नियमाप्रमाणे तिसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये ७ ते १० लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ३ लाख रु वर १०% म्हणजे ३० हजार रु टॅक्स होईल. मात्र नवीन नियमानुसार तिसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ८ ते १२ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे उरलेल्या २ लाख रु वर १०% म्हणजे २० हजार रु टॅक्स होईल.

आता तुम्ही टॅक्सची एकूण रक्कम बघितली तर जुन्या नियमानुसार १० लाखांवर ५० हजार आणि नवीन नियमानुसार १० लाखांवर ४० हजार रु टॅक्स होईल. म्हणजे नवीन नियमानुसार आपल्याला १० हजार रु टॅक्समध्ये बचत होईल.

आर्थिक वर्ष २०२४-२५ आर्थिक वर्ष २०२५-२६
वार्षिक उत्पन्न 1075000 वार्षिक उत्पन्न 1075000
स्टॅंडर्ड डिडक्शन 75000 स्टॅंडर्ड डिडक्शन 75000
करपात्र उत्पन्न 1000000 करपात्र उत्पन्न 1000000
० ते ३ लाख (०%) 0 ० ते ४ लाख (०%) 0
३ ते ७ लाख (५%) 20000 ४ ते ८ लाख (५%) 20000
७ ते १० लाख (१०%) 30000 ८ ते १२ लाख (१०%) 20000
१० ते १२ लाख (१५%) 0 १२ ते १६ लाख (१५%) 0
१२ ते १५ लाख (२०%) 0 १६ ते २० लाख (२०%) 0
१५ लाख पेक्षा जास्त (३०%) 0 २० ते २४ लाख (२५%) 0
२४ लाख पेक्षा जास्त (३०%) 0
50000 प्राप्तिकर 40000
शैक्षणिक उपकर 2000 शैक्षणिक उपकर 0
रिबेट 0 रिबेट 40000
प्राप्तिकर 52000 प्राप्तिकर 0

इथं जुन्या नियमानुसार आपल्याला संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकरासह भरावा लागेल कारण ७ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे.  मात्र नवीन नियमानुसार १२ लाखांपर्यंतच्या उत्पनावर टॅक्स च्या रकमेवर रिबेट मिळतो. त्यामुळे नवीन नियमानुसार हे उत्पन्न सुद्धा करमुक्त होईल. आणि आपली टॅक्स मध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त बचत नवीन नियमानुसार होईल

भारतात किती पगार करमुक्त आहे?

आता आपण समजूया कि

  • वार्षिक उत्पन्न १२,७५,००० रु आहे.
  • त्यातून ७५ हजार स्टॅंडर्ड डिडक्शन होईल. त्यामुळे उरले १२ लाख रु.
  • आता जुन्या टॅक्स स्लॅब नुसार एकूण कराची रक्कम ८० हजार होईल. मात्र नवीन टॅक्स स्लॅब नुसार एकूण कराची रक्कम ६० हजार होईल.

कराच्या या आकडेमोडीचा तपशील तुम्हाला खालील टेबल मध्ये दिसतोच आहे. इथं सुद्धा नवीन टॅक्स स्लॅब मुळे २० हजार रु टॅक्स ची बचत होते आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ आर्थिक वर्ष २०२५-२६
वार्षिक उत्पन्न 1275000 वार्षिक उत्पन्न 1275000
स्टॅंडर्ड डिडक्शन 75000 स्टॅंडर्ड डिडक्शन 75000
करपात्र उत्पन्न 1200000 करपात्र उत्पन्न 1200000
० ते ३ लाख (०%) 0 ० ते ४ लाख (०%) 0
३ ते ७ लाख (५%) 20000 ४ ते ८ लाख (५%) 20000
७ ते १० लाख (१०%) 30000 ८ ते १२ लाख (१०%) 40000
१० ते १२ लाख (१५%) 30000 १२ ते १६ लाख (१५%) 0
१२ ते १५ लाख (२०%) 0 १६ ते २० लाख (२०%) 0
१५ लाख पेक्षा जास्त (३०%) 0 २० ते २४ लाख (२५%) 0
२४ लाख पेक्षा जास्त (३०%) 0
80000 प्राप्तिकर 60000
शैक्षणिक उपकर 3200 शैक्षणिक उपकर 0
रिबेट 0 रिबेट 60000
प्राप्तिकर 83200 प्राप्तिकर 0

मात्र जुन्या नियमानुसार आपल्याला संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकरासह भरावा लागेल कारण ७ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे.  मात्र नवीन नियमानुसार १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स च्या रकमेवर रिबेट मिळतो. त्यामुळे नवीन नियमानुसार हे उत्पन्न सुद्धा करमुक्त होईल.

१२ लाखांहून जास्त उत्पन्न असेल तर किती प्राप्तिकर भरावा लागेल?

आता आपण या उदाहरणाद्वारे हे बघूया कि १२ लाखांहून जास्त उत्पन्न असेल तर किती प्राप्तिकर भरावा लागेल?

आपण समजूया कि

  • वार्षिक उत्पन्न १३,७५,००० रु आहे.
  • त्यातून ७५ हजार स्टॅंडर्ड डिडक्शन होईल. त्यामुळे उरले १३ लाख रु.
  • आता जुन्या टॅक्स स्लॅब नुसार एकूण कराची रक्कम १ लाख रु होईल. मात्र नवीन टॅक्स स्लॅब नुसार एकूण कराची रक्कम ७५ हजार होईल.

कराच्या या आकडेमोडीचा तपशील तुम्हाला खालील टेबल मध्ये दिसतोच आहे. इथं सुद्धा नवीन टॅक्स स्लॅब मुळे २५ हजार रु टॅक्स ची बचत होते आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ आर्थिक वर्ष २०२५-२६
वार्षिक उत्पन्न 1375000 वार्षिक उत्पन्न 1375000
स्टॅंडर्ड डिडक्शन 75000 स्टॅंडर्ड डिडक्शन 75000
करपात्र उत्पन्न 1300000 करपात्र उत्पन्न 1300000
० ते ३ लाख (०%) 0 ० ते ४ लाख (०%) 0
३ ते ७ लाख (५%) 20000 ४ ते ८ लाख (५%) 20000
७ ते १० लाख (१०%) 30000 ८ ते १२ लाख (१०%) 40000
१० ते १२ लाख (१५%) 30000 १२ ते १६ लाख (१५%) 15000
१२ ते १५ लाख (२०%) 20000 १६ ते २० लाख (२०%) 0
१५ लाख पेक्षा जास्त (३०%) 0 २० ते २४ लाख (२५%) 0
२४ लाख पेक्षा जास्त (३०%) 0
100000 प्राप्तिकर 75000
शैक्षणिक उपकर 4000 शैक्षणिक उपकर 3000
रिबेट 0 रिबेट
प्राप्तिकर 104000 प्राप्तिकर 78000

इथं आपल्याला दोन्ही म्हणजे जुन्या आणि नवीन नियमानुसार संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकरासह भरावा लागेल, हा टॅक्स जुन्या नियमानुसार १ लाख ४ हजार रु होतो आणि नवीन नियमानुसार ७८ हजार रु होतो. म्हणजे अंतिम कराच्या रकमेत सुद्धा २६ हजार रु बचत होते.

तर या चार उदाहरणांमधून तुमच्या लक्षात आलं असेल कि प्राप्तिकराची आकडेमोड कशाप्रकारे केली जाते आणि त्यात सवलती किंवा वजावटी कशा मिळतात आणि प्राप्तिकराच्या रकमेत बचत कशी होते किंवा करता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन आर्थिक वर्षात भारतात किती पगार करमुक्त आहे?

मंडळी, आता पुढचा अपडेट आहे टीडीएसच्या संदर्भात.

नवीन टीडीएस अपडेट काय आहे?

यापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२५ पर्यंत बँकेतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर

जेष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा ५० हजार रु होती जी आता १ एप्रिल २०२५ पासून वाढवून १ लाख रु करण्यात आली आहे. म्हणजे जेष्ठ नागरिकांना बँकेच्या ठेवींमधून मिळणारं व्याज आता एका आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त झालं तरच टीडीएस कपात करण्यात येईल.

सामान्य ठेवीदार म्हणजे ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी यापूर्वी बँकेतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपातीची मर्यादा ४० हजार रु होती जी आता १ एप्रिल २०२५ पासून वाढवून ५० हजार रु करण्यात आली आहे. म्हणजे सामान्य ठेवीदारांना बँकेच्या ठेवींमधून मिळणारं व्याज आता एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त झालं तरच टीडीएस कपात करण्यात येईल.

तसंच नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स मध्ये ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस ची मर्यादा ५ हजार रु होती ती आता १ एप्रिल २०२५ पासून वाढवून १० हजार करण्यात आली आहे. म्हणजे नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स मध्ये ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम आता एका आर्थिक वर्षात १० हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तरच टीडीएस कपात करण्यात येईल.

टीडीएस
जुनी मर्यादा नवीन मर्यादा
जेष्ठ नागरिक ५०,००० १,००,०००
सामान्य ठेवीदार ४०,००० ५०,०००
नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ५,००० १०,०००

मात्र, मंडळी हे सर्व बदल नवीन टॅक्स रेजिम मध्ये करण्यात आले आहेत आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत.

तर मंडळी, आज आपण बघितलं कि भारतात किती पगार करमुक्त आहे? त्याच बरोबर टीडीएस विषयी नवीन अपडेट्स सुद्धा आपण बघितले. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर कराम्हणजे याचा उपयोग इतरांना सुद्धा होईल. धन्यवाद.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *