एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? | how to save income tax on fd interest

एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा?

मंडळी, आज आपण बघणार आहोत एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? म्हणजे आपण एफडी मध्ये किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला जे व्याज मिळतं त्या व्याजावर आकारल्या जाणाऱ्या करामध्ये बचत कशी करायची?

महत्वाचे मुद्दे

प्रस्तावना

मंडळी, बचत योजनांमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेव हा एक अतिशय प्रसिद्ध गुंतवणुकीचा पर्याय आहे. पोस्टाच्या योजनाची सुद्धा नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यातल्या बहुतेक योजना मुदत ठेवी सारख्याच आहेत.
उदा.

  • पोस्टाची मुदत ठेव योजना,
  • किसान विकास पत्र,
  • जेष्ठ नागरिक बचत योजना,
  • पोस्टाची मासिक उत्पन्न योजना,
  • राष्ट्रीय बचत योजना

या योजना सुद्धा मुदत ठेवींसारख्याच आहेत. त्यामुळे त्या योजनांमध्ये मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा सामान्य मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाचेच नियम लागू होतात.

मंडळी, एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मुदत ठेव म्हणजे काय? हे माहिती करून घ्यावं लागेल.

बँकेत मुदत ठेव म्हणजे काय?

मुदत ठेव म्हणजे आपल्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. ही रक्कम आपल्याला एकदम म्हणजे एकरकमी गुंतवावी लागते. त्यावर आपल्याला व्याज दिलं जातं. मुदत ठेव आपण बँकेत, पोस्टात किंवा पतपेढीमध्ये काढू शकतो.

सरळ व्याज म्हणजे काय? (Simple Interest)

व्याज देण्यासाठी अनेक पर्याय असतात ज्यामध्ये दर महिना, दर तीन महिन्यांनी, दर वर्षी आपल्याला व्याज दिलं जातं. या प्रकाराला सरळ व्याज असं म्हणतात. म्हणजे जेवढा व्याजदर असेल तेवढच व्याज आपल्याला दरवर्षी मिळतं.

जमा व्याज म्हणजे काय? (Accrued Interest)

या शिवाय व्याजाचा अजून एक प्रकार असतो ज्याला अक्र्युड इंटरेस्ट किंवा जमा व्याज असं आपण म्हणतो. अक्र्युड इंटरेस्ट किंवा जमा व्याज म्हणजे असं व्याज जे तुमच्या नावावर जमा केलं जातं पण ते तुम्हाला दिलं जात नाही आणि बहुतेक वेळेला हे व्याज मुदत संपल्यावर मूळ रकमेबरोबर दिलं जातं.

या अक्र्युड इंटरेस्ट किंवा जमा व्याज पद्धतीचा फायदा अनेकदा असा होतो कि हे व्याज आपल्याला चक्रवाढ पदतीने दिलं जातं. म्हणजे मूळ रकमेवर व्याज लागू होतं आणि एका ठराविक कालावधी नंतर ते व्याज मूळ रकमेत जोडलं जाऊन त्या वाढीव रकमेवर व्याज दिलं जातं. याला कम्पाउंडिंग किंवा चक्रवाढ असं म्हणतात. म्हणजे व्याजावर व्याज मिळतं. त्यामुळे या प्रकारात आपल्याला योजनेच्या व्याजदरापेक्षा थोडासा जास्त परतावा मिळतो.

तर अशा प्रकारे आपल्याला जे व्याज मिळतं त्या व्याजावर दोन प्रकारे प्राप्तिकर आकारला जातो.

पहिला प्रकार आहे टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स.

टीडीएस म्हणजे काय?

टीडीएस हा सुद्धा प्राप्तिकराचाच एक भाग आहे. फक्त हा कर आगाऊ कर म्हणून घेतला जातो.

या प्रकारात व्याजाची रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर आपल्याला जेव्हा व्याज दिलं जातं त्यावेळी त्यावर १०% कर आधी कापून घेतला जातो मग आपल्याला व्याजाची रक्कम दिली जाते.

टीडीएस मर्यादा किती आहे?

टीडीएस ची मर्यादा सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे ६० पेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी ५० हजार रु आहे आणि जेष्ठ नागरिकासाठी १ लाख रु आहे. म्हणजे जर सामान्य ठेवीदारांना एका आर्थिक वर्षात ठेवीवरील व्याज ५० हजार रु पेक्षा जास्त मिळालं तर त्यावर व्याजाच्या रकमेच्या १०% टीडीएस कपात केली जाते आणि जेष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना एका आर्थिक वर्षात ठेवीवरील व्याज १ लाख रु पेक्षा जास्त मिळालं तर त्यावर  व्याजाच्या रकमेच्या १०% टीडीएस कपात केली जाते.

मुदत ठेवींवरील टीडीएस कसा टाळायचा?

ही टीडीएस कपात टाळण्यासाठी सामान्य ठेवीदार फॉर्म १५ जी आणि जेष्ठ नागरिक फॉर्म १५ एच भरू शकतात. ज्यामुळे त्यांना जरी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्याज मिळालं तरी त्यावर टीडीएस कपात केली जात नाही.

टीडीएस कसा परत मिळवायचा?

मात्र, जर काही कारणाने तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागू केला गेला आणि जर तुमचं उत्पन्न करपात्र नसेल तर तुम्ही आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरून ती टीडीएस ची रक्कम परत मिळवू शकता.

मात्र तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल तरीसुद्धा तुम्हाला आयकर विवरणपत्र भरायला लागतं पण टीडीएस ची रक्कम परत मिळत नाही.

हा होता पहिला प्रकार म्हणजे टीडीएस जो मुदत ठेवीवर आगाऊ कर म्हणून लागू केला जातो.

आता बघूया फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेवीवर भरावा लागणारा कराचा दुसरा प्रकार म्हणजे प्राप्तिकर किंवा इन्कम टॅक्स.

प्राप्तिकर म्हणजे काय?

मंडळी, कुठल्याही मुदत ठेवीच्या व्याजावर आपल्याला प्राप्तिकर भरावाच लागतो. फक्त या बाबतीत एक महत्वाची अट अशी आहे की तुमचं उत्पन्न करपात्र असलं पाहिजे. करपात्र उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न जे प्राप्तिकर विभागाने ठरवून दिलेल्या टॅक्स स्लॅबनुसार एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल.

नवीन आणि जुन्या कर प्रणालीमध्ये काय फरक आहे?

आता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबल मध्ये जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिम चे टॅक्स स्लॅब्स दिसत आहेत. इथं टॅक्स रेजिम म्हणजे करप्रणाली असं आपण म्हणू शकतो. भारतात प्राप्तिकर भरण्यासाठी २ करप्रणाली उपलब्ध आहेत. जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली. आणि प्रत्येक करप्रणाली नुसार त्याचे वेगळे टॅक्स स्लॅब्स म्हणजे कररचना ठरवून दिलेल्या आहेत. तुम्ही यातली जी करप्रणाली निवडाल त्याप्रमाणे तुमच्या उत्पन्नावर कराची आकडेमोड केली जाते.

जुनी करप्रणाली नवीन करप्रणाली
वार्षिक उत्पन्न  कररचना  वार्षिक उत्पन्न  कररचना 
० ते २,५०,००० ०% ० ते ४ लाख ०%
२,५०,००१ ते ५,००,००० ५% ४ लाख ते ८ लाख ५%
५,००,००१ ते १०,००,००० २०% ८ लाख ते १२ लाख १०%
१०,००,००० पेक्षा जास्त ३०% १२ लाख ते १६ लाख १५%
१६ लाख ते २० लाख २०%
२० लाख ते २४ लाख २५%
२४ लाख पेक्षा जास्त ३०%

जुन्या करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमचं उत्पन्न करमुक्त होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागत नाही आणि नवीन करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न १२ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमचं उत्पन्न करमुक्त होतं.

तर मंडळी, जर आपण मुदत ठेवीच्या व्याजावर प्राप्तिकराच्या आकडेमोडीचा विचार केला तर त्याची एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. आपल्याला मुदत ठेवीवर मिळणारं वार्षिक व्याजाचं उत्पन्न आपल्या इतर उत्पन्नाच्या रकमेत जोडलं जातं आणि मग त्या एकूण उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते.

उदा.

जर तुमचं पगारातून मिळणारं वार्षिक उत्पन्न १० लाख रु आहे आणि तुम्हाला मुदत ठेवीमधून मिळणारं व्याजाचं वार्षिक उत्पन्न ५० हजार रु आहे. तर या दोन्ही उत्पन्नाची बेरीज करून त्या एकूण उत्पन्नावर म्हणजे १०,५०,००० रुपयांवर टॅक्स स्लॅब प्रमाणे प्राप्तिकर आकारला जातो.

थोडक्यात सांगायचं तर मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू करण्यासाठी वेगळे नियम नाहीत. तर पगारातून किंवा पेन्शन मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जे नियम लागू होतात तेच नियम मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर लागू होतात.

एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा?

मंडळी, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योग्य करप्रणाली निवडावी लागेल. कारण योग्य करप्रणाली निवडल्यामुळे सुद्धा प्राप्तिकराच्या रकमेत आपल्याला जास्तीत जास्त बचत करणं शक्य होतं.

आता १ एप्रिल २०२५ पासून नवीन करप्रणालीच जास्त सोयीची करण्यात आलेली आहे कारण १ एप्रिल २०२५ पासून तुम्ही जे उत्पन्न मिळवाल ते उत्पन्न जर १२ लाखांपर्यंत असेल तर पूर्णपणे करमुक्त असेल त्यावर एकही रुपया कर भरावा लागणार नाही.

आणि जरी १२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी त्यावर जुन्या करप्रणाली च्या तुलनेत नवीन करप्रणाली निवडल्यास कमी कर भरावा लागेल. कारण जुन्या करप्रणालीच्या टॅक्स स्लॅब्स नुसार जास्त कर आकारला जातो.

आणि जरी तुम्ही जुन्या करप्रणाली मधील सवलती आणि वजावटी वापरल्या तरी त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. त्यामुळे प्राप्तिकरात बचत करण्यासाठी नवीन करप्रणालीच योग्य ठरते.

त्यामुळे योग्य करप्रणाली निवडणं हे सुद्धा प्राप्तिकराच्या रकमेत बचत करण्यासाठी महत्वाचं ठरतं.

एफडी व्याजावरील कर कसा मोजायचा?

तर आता हि आकडेमोड कशी केली जाते हे आपण उदाहरणासकट बघूया. तसंच आपण या उदाहरणामध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही करप्रणालीचा वापर करून बघूया ज्यामुळे तुम्हाला हे समजेल कि कुठली करप्रणाली निवडणं योग्य आहे.

आपण असं समजूया कि तुम्हाला पगारातून किंवा पेन्शन मधून मिळणारं वार्षिक उत्पन्न १२ लाख रु आहे. तसंच तुम्हाला मुदत ठेवींमधून सुद्धा व्याजाचं उत्पन्न मिळतं जे वार्षिक १ लाख रु आहे. हे मुदत ठेवीमधून मधून मिळणारं उत्पन्न इन्कम फ्रॉम आदर सोर्सेस या प्रकारात धरलं जातं.

इन्कम फ्रॉम आदर सोर्सेसचा अर्थ काय आहे?

इन्कम फ्रॉम आदर सोर्सेस म्हणजे इतर मार्गांनी मिळवलेलं उत्पन्न. म्हणजे जी प्रमुख उत्पन्नाची साधनं आहेत उदा. पगार, पेन्शन, घरभाडं, व्यवसाय किंवा स्वतः च्या मालकीची कुठलीही मालमत्ता विकून मिळालेलं उत्पन्न याशिवाय इतर मार्गांनी मिळालेलं उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम आदर सोर्सेस.

तर हे ठेवींवरील व्याजाचं उत्पन्न या उत्पन्नाच्या यादीत येत नाही म्हणून ते इन्कम फ्रॉम आदर सोर्सेस म्हणून धरलं जातं.

प्राप्तिकराच्या आकडेमोडीची पूर्वतयारी

आता या मुदत ठेवीच्या उत्पन्नावर  प्राप्तिकराच्या आकडेमोडी साठी कुठलेही वेगळे नियम दिलेले नाहीत. मुदत ठेवीच्या व्याजातून मिळणारं हे उत्पन्न आपल्या प्रमुख उत्पन्नाच्या रकमेशी जोडलं जातं आणि मग जी एकूण रक्कम होईल त्यावर तुम्ही निवडलेल्या करप्रणालीनुसार प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते.

म्हणजे तुमचं प्रमुख उत्पन्न १२ लाख रु आणि ठेवींवरील व्याजाचं उत्पन्न १ लाख म्हणजे एकूण उत्पन्न १३ लाख रु होतं.

पण इथं अजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे टीडीएस चा. तुम्हाला १ लाख रु व्याज मिळालं आहे त्यामुळे त्यावर टीडीएस कपात केली आहे असं आपण समजूया. त्यामुळे एक लाखावर १०% म्हणजे १० हजार रु टीडीएस घेतला आहे असं आपण समजूया.

तर आता या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपण जुन्या आणि नवीन करप्रणाली नुसार किती कर भरावा लागेल हे बघूया.

जुनी करप्रणाली नवीन करप्रणाली
पहिली पायरी  वार्षिक उत्पन्न ₹1,200,000.00 वार्षिक उत्पन्न ₹1,200,000.00
स्टॅंडर्ड डिडक्शन ₹50,000.00 स्टॅंडर्ड डिडक्शन ₹75,000.00
₹1,150,000.00 ₹1,125,000.00
दुसरी पायरी  व्याजाचं उत्पन्न ₹100,000.00 व्याजाचं उत्पन्न ₹100,000.00
₹1,250,000.00 ₹1,225,000.00
तिसरी पायरी  वजावटी ₹200,000.00 वजावटी ₹0.00
वार्षिक करपात्र उत्पन्न ₹1,050,000.00 वार्षिक करपात्र उत्पन्न ₹1,225,000.00
चौथी पायरी  स्लॅब १ (०%) ० ते २.५ लाख ₹0.00 स्लॅब १ (०%) ० ते ४ लाख ₹0.00
स्लॅब २ (५%) २.५ लाख ते ५ लाख ₹12,500.00 स्लॅब २ (५%) ४ लाख ते ८ लाख ₹20,000.00
स्लॅब ३ (२०%) ५ लाख ते १० लाख ₹100,000.00 स्लॅब ३ (१०%) ८ लाख ते १२ लाख ₹40,000.00
स्लॅब ४ (३०%) १० लाखांहून जास्त ₹15,000.00 स्लॅब ४ (१५%) १२ लाख ते १६ लाख ₹3,750.00
स्लॅब ५ (२०%) १६ लाख ते २० लाख ₹0.00
स्लॅब ६ (२५%) २० लाख ते २४ लाख ₹0.00
स्लॅब ७ (३०%) २४ लाखांहून जास्त ₹0.00
स्लॅबनुसार प्राप्तिकर ₹127,500.00 स्लॅबनुसार प्राप्तिकर ₹63,750.00
पाचवी पायरी  रिबेट (८७ए) ₹0.00 रिबेट (८७ए) ₹38,750.00
₹127,500.00 ₹25,000.00
सहावी पायरी  उपकर ४% ₹5,100.00 उपकर ४% ₹1,000.00
प्राप्तिकर ₹132,600.00 प्राप्तिकर ₹26,000.00
सातवी पायरी  टीडीएस ₹10,000.00 टीडीएस ₹10,000.00
प्राप्तिकर ₹122,600.00 प्राप्तिकर ₹16,000.00

पहिली पायरी – स्टॅण्डर्ड डिडक्शन

तर आता तुम्हाला स्क्रीन वर दिसत आहे त्यानुसार प्रमुख उत्पन्न म्हणजे नोकरी किंवा पेन्शन चं उत्पन्न १२ लाख रु आहे. त्यातून सगळ्यात आधी जुन्या करप्रणालीनुसार ५० हजार रु ची आणि नवीन करप्रणालीनुसार ७५ हजार रु ची वजावट मिळेल. या वजावटीला स्टॅण्डर्ड डिडक्शन असं म्हणतात आणि ही वजावट फक्त पगार किंवा पेन्शन च्या उत्पन्नावर दिली जाते.

दुसरी पायरी – मुदत ठेवीवरील व्याज

आता जुन्या करप्रणालीनुसार उरले ११,५०,००० आणि नवीन करप्रणालीनुसार ११,२५,०००. या रकमेत आता व्याजाचं उत्पन्न जोडलं जाईल. म्हणजे १ लाख रु. त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार १२,५०,००० आणि नवीन करप्रणालीनुसार १२,२५,००० एवढं उत्पन्न होईल.

इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कि आपल्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात आधीच झालेली आहे. तरीसुद्धा आपल्याला इथे पूर्ण व्याजाची रक्कम दाखवावी लागते. कारण जेव्हा आपली प्राप्तिकराची सगळी आकडेमोड पूर्ण होईल तेव्हा त्या कराच्या रकमेतून टीडीएसच्या रकमेची वजावट केली जाते.

तिसरी पायरी – जुन्या टॅक्स रेजिममधील वजावटी

आता यानंतर आपण जुन्या करप्रणाली मध्ये ज्या वजावटी आहेत त्यातील ८० सी नुसार दीड लाख आणि ८० डी नुसार ५० हजार एवढ्या वजावटी गृहीत धरल्या आहेत. म्हणजे एकूण २ लाख रु एवढी वजावट आपल्याला जुन्या करप्रणाली अंतर्गत मिळेल. त्यामुळे जुन्या करप्रणाली नुसार १०,५०,००० एवढं उत्पन्न शिल्लक राहील.

मात्र, नवीन करप्रणाली अंतर्गत आपण आत्ता तरी कुठलीही वजावट धरलेली नाही त्यामुळे नवीन करप्रणाली नुसार उत्पन्न १२,२५,००० एवढंच राहील.

त्यामुळे आता या उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाईल.

चौथी पायरी – टॅक्स स्लॅब नुसार आकडेमोड

पहिला टॅक्स स्लॅब

आता जुन्या करप्रणाली मध्ये पहिल्या टॅक्स स्लॅबमधे पहिल्या अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे, त्यामुळे १०,५०,००० मधून २,५०,००० रु वजा केल्यावर ८ लाख एवढं उत्पन्न शिल्लक राहील आणि नवीन करप्रणाली नुसार पहिल्या टॅक्स स्लॅबमधे पहिल्या ४ लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे, त्यामुळे १२,२५,००० मधून ४,००,००० रु वजा केल्यावर ८,२५,००० एवढं उत्पन्न शिल्लक राहील.

दुसरा टॅक्स स्लॅब

आता जुन्या करप्रणाली मध्ये दुसऱ्या टॅक्स स्लॅबमधे अडीच लाख ते ५ लाखांदरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील  अडीच लाख एवढ्या उत्पन्नावर ५% कर आकारला जातो, त्यामुळे हि कराची रक्कम १२,५०० एवढी होईल. आता दुसया टॅक्स स्लॅब ची आकडेमोड झाली त्यामुळे ८ लाख मधून २,५०,००० रु वजा केल्यावर ५,५०,००० एवढं उत्पन्न शिल्लक राहील

आणि नवीन करप्रणाली मध्ये दुसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ४ लाख ते ८ लाखांदरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ४ लाख एवढ्या उत्पन्नावर ५% कर आकारला जातो, त्यामुळे हि कराची रक्कम २०,००० एवढी होईल. आता दुसया टॅक्स स्लॅब ची आकडेमोड झाली त्यामुळे ८,२५,००० मधून ४ लाख रु वजा केल्यावर ४,२५,००० एवढं उत्पन्न शिल्लक राहील.

तिसरा टॅक्स स्लॅब

आता जुन्या करप्रणाली मध्ये तिसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ५ लाख एवढ्या उत्पन्नावर २०% कर आकारला जातो, त्यामुळे हि कराची रक्कम १ लाख रु एवढी होईल. आता तिसऱ्या टॅक्स स्लॅब ची आकडेमोड झाली त्यामुळे ५,५०,००० मधून ५ लाख रु वजा केल्यावर ५० हजार रु एवढं उत्पन्न शिल्लक राहील

आणि नवीन करप्रणाली मध्ये तिसऱ्या टॅक्स स्लॅबमधे ८ लाख ते १२ लाखांदरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ४ लाख एवढ्या उत्पन्नावर १०% कर आकारला जातो, त्यामुळे हि कराची रक्कम ४०,००० एवढी होईल. आता तिसऱ्या टॅक्स स्लॅब ची आकडेमोड झाली त्यामुळे ४,२५,००० मधून ४ लाख रु वजा केल्यावर २५ हजार एवढं उत्पन्न शिल्लक राहील.

चौथा टॅक्स स्लॅब

आता जुन्या करप्रणाली मध्ये चौथ्या टॅक्स स्लॅबमधे १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर आकारला जातो, उरलेल्या ५० हजार रु वर कराची रक्कम १५ हजार रु एवढी होईल.

आणि नवीन करप्रणाली मध्ये चौथ्या टॅक्स स्लॅबमधे १२ लाख ते १६ लाखांदरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील ४ लाख एवढ्या उत्पन्नावर १५% कर आकारला जातो, त्यामुळे उरलेल्या २५ हजार रु वर हि कराची रक्कम ३,७५० रु एवढी होईल.

या नंतर आपलं उत्पन्न इथं संपतं त्यामुळे पुढे आकडेमोड करण्याची गरज उरत नाही.

आणि जुन्या करप्रणाली नुसार एकूण कर १,२७,५०० रु होतो आणि नवीन करप्रणाली नुसार एकूण कर ६३,७५० रु होतो.

आता जुन्या करप्रणाली नुसार ५ लाखांपर्यंत च उत्पन्न करमुक्त आहे पण आपलं उत्पन्न १०,५०,००० एवढं होतं आणि नवीन करप्रणाली नुसार १२ लाखांपर्यंत च उत्पन्न करमुक्त आहे पण आपलं उत्पन्न १२,२५,००० एवढं होतं त्यामुळे दोन्ही करप्रणालीमध्ये आपल्याला कर भरावाच लागेल. फक्त नवीन करप्रणालीअंतर्गत करामध्ये एक अजून सवलत दिली जाते ती म्हणजे मार्जिनल रिलीफ.

मार्जिनल रिलीफ म्हणजे काय?

मार्जिनल रिलीफ म्हणजे १२ लाखांपेक्षा जास्त आणि एका ठराविक मर्यादेपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर १२ लाखांवर जेवढा कर होतो तो पूर्णपणे माफ केला जातो आणि उरलेल्या रकमेएवढा कर आकारला जातो.

मार्जिनल रिलीफ साठीची मर्यादा नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी १३,४५,५८८ रु एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आणि स्टॅंडर्ड डिडक्शन लागू होत नसेल तर म्हणजे व्यावसायिक करदात्यांसाठी १२,७०,५८८ रु एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे.

पात्र करदाते  मर्यादा 
नोकरदार/पेन्शनर करदाते १३,४५,५८८ रुपये
व्यावसायिक करदाते १२,७०,५८८ रुपये

पाचवी पायरी – प्राप्तिकराची रक्कम

त्यामुळे इथं आपल्या उदाहरणामध्ये नवीन करप्रणाली नुसार उत्पन्न १२,२५,००० रु आहे म्हणजे १२ लाखांपेक्षा २५ हजार रु जास्त आहे. त्यामुळे इथे नवीन करप्रणाली नुसार आपण केलेल्या आकडेमोडी नुसार ६३,७५० या रकमेतून २५ हजार रु एवढ्या रकमेवर कर भरावा लागेल आणि उरलेली ३८,७५० रु एवढी कराची रक्कम माफ होईल. थोडक्यात, नवीन करप्रणालीनुसार १२,२५,००० एवढ्या उत्पन्नावर फक्त २५,००० रु कर भरावा लागेल.

सहावी पायरी – शैक्षणिक उपकर

मात्र,दोन्ही कराच्या रकमांवर ४% शैक्षणिक उपकर भरावा लागतो. म्हणजे जुन्या करप्रणाली साठी १,२७,५००रु वर ५१०० रु म्हणजे एकूण टॅक्स १३२,६०० रु होईल आणि नवीन करप्रणाली साठी २५,०००रु वर १००० रु म्हणजे एकूण टॅक्स २६,००० रु होईल.

सातवी पायरी – टीडीएस रिफंड

मात्र इथं अजून एक महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे टीडीएस कपातीची रक्कम. आता कराची सगळी आकडेमोड करून झाल्यावर शेवटी टीडीएस कपातीच्या रकमेची ॲडजस्टमेन्ट केली जाते. त्यामुळे जुन्या करप्रणाली नुसार होणाऱ्या एकूण कराच्या रकमेतून आणि नवीन करप्रणाली नुसार होणाऱ्या एकूण कराच्या रकमेतून प्रत्येकी १० हजार रु जी टीडीएस ची रक्कम होती ती वजा करावी लागेल कारण ती रक्कम आपल्या कडून आगाऊ कर म्हणून घेतली गेली होती.

त्यामुळे जुन्या करप्रणाली नुसार एकूण कर १३२,६०० – टीडीएस १०००० = १,२२,६०० रु एवढा कर भरावा लागेल आणि नवीन करप्रणाली नुसार एकूण कर २६,००० – टीडीएस १०,००० = १६,००० रु एवढा कर भरावा लागेल.

तर मंडळी, तुम्हाला आता लक्षात आलं असेल कि एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? किंवा तुम्हाला मुदत ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर कशा प्रकारे प्राप्तिकर आकारला जातो आणि त्यात बचत कशी करता येते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या बहुमूल्य कमेंट्स नक्की द्या आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *